Tuesday, February 24, 2015

मी नास्तिक का आहे? -भगतसिंग part 2 of 6

पुढे मी क्रांतिकारी पक्ष्यात सामील झालो. सर्वात आधी मी ज्याच्या सानिध्यात आलो त्या आमच्या नेत्याची देवाबद्दलची पक्की खात्री नसली तरी तो देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकत नसे. माझ्या देवाविषयीच्या सततच्या चौकाशांवर तो म्हणत असे, 'जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्रार्थना करत जा.' आता हे म्हणजे नास्तिकता उणे ते मत म्हणून अंगीकारण्यास लागणारे धैर्य होय. मी ज्याच्या सहवासात आलो तो दुसरा नेता कट्टर आस्तिक होता. त्याचा नामोल्लेख करायचा तर ते म्हणजे कराची कटासंबंधी आता जन्मठेपेची शिशा भोगत असलेले आदरणीय कॉ. सचिंद्रनाथ संन्याल. 'बंदिजीवन' या त्यांच्या सुप्रसिद्ध व एकमेव पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानापासून देवाची थोरवी आवेशाने गायलेली आहे. त्या सुंदर पुस्तकाच्या दुसर्या भागाच्या शेवटच्या पानावर वेदांतनिष्ठेशी सुसंगत अशा स्तुतीसुमनांचा देवावर केलेला वर्षाव हा त्यांच्या गुढवादी विचारांचा एक सहज लक्ष्यात येण्याजोगा भाग आहे. २८ जानेवारी १९२५ रोजी हिंदुस्तानभर वाटली गेलेली 'क्रांतिकारी पुस्तिका' हीसुद्धा त्यांच्याच लेखणीतून उतरलेली आहे असे सरकारी बाजूचे म्हणणे आहे. आता गुप्त संघटनेच्या कामात नेहमी प्रमुख नेता आपली स्वतःचीच मते मांडतो व जवळच्या लोकांना  ती मान्य करावी लागतात.कार्यकर्त्यांचे त्याविषयी मतभेद असले तरी त्यांना नेत्याच्या मतांना मूकपणे संमती द्यावी लागते. त्या पुस्तिकेतील एक संपूर्ण परिच्छेद देवाची थोरवी, त्याची विश्वक्रीडा आणि अगाध लीला यांवर आहे. हे सर्व म्हणजे गुढवाद आहे. एकूण सांगायचे तर क्रांतिकारी पक्षात ईश्वराचा अविश्वास ही कल्पना मुळीच रुजलेली नव्हती हेच मला दाखवायचे होते.

चारही सुप्रसिद्ध काकोरी क्रांतिवीरांनी त्यांचा शेवटचा दिवस इस्वराच्या प्रार्थनेत घालवला. राम प्रसाद बिस्मिल हा सनातनी आर्यसमाजी होता. समाजवाद आणि साम्यवादाच्या क्षेत्रात खूप अभ्यास असूनही राजन लाहिरी हा उपनिषधे व गीतेतील स्तोत्रे पाठन करण्याची आपली इच्छा आवरु शकला नाही. यांच्यातला एकच मनुष्य मी पहिला आहे कि ज्याने कधीही प्रार्थना केली नाही आणि तो म्हणत असे, 'तत्वज्ञान ही माणसातला दुबळेपणा व त्याच्या ज्ञानाची मर्यादा यांची निष्पत्ती आहे.' हा माणूससुद्धा अआज जन्मठेपेची शिक्ष भोगत आहे. परंतु तोसुद्धा देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकला नाही.  

तोपर्यंत मी फक्त एक स्वप्नाळू आदर्शवादी क्रांतिकारक होतो. त्या वेळेपावतो आम्ही फक्त अनुयायी होतो. सर्व जबाबदारी स्वतःवर पेलण्याची जबाबदारी आमच्यावर आली. अपरिहार्य अशा दडपशाहीमुळे पक्षाचे अस्तित्व मुळी काही काळ अशक्य वाटू लागले होते. उत्साही कॉम्रेड्स नव्हे तर नेतेच आमची हेटाळनी करू लागले. एखाद्या दिवशी आमच्या स्वतःच्या कार्यक्रमाच्या व्यर्थतेची मलासुद्धा खात्री पटणार कि काय अशी भीती मला काही काळ वाटायची. ती वेळ म्हणजे माझ्या क्रांतिकारक आयुष्यातला निर्णायक क्षण होता, महत्वाचे वळण होते. 'अभ्यास कर' अशी हक माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली : प्रतीस्पर्ध्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला तोंड देता येणे शक्य व्हावे म्हणून अभ्यास कर; तुझ्या निष्ठेच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी भरभक्कम दारुगोळा जमवण्याकरता अभ्यास कर. मी अभ्यासाला सुरुवात केली.

माझ्या सुरुवातीच्या श्रद्धा आणि ठाम मते यात त्यानंतर ठळक बदल झाले. आमच्या आधीच्या लोकांचा फक्त हिंसक कृतींवर भर होता. त्या स्वप्नाळूपणाची जागा आता गंबीर विचारांनी घेतली. गुढवाद आणि आंधळी निष्ठा विरून गेली. वास्तववाद ही आमची निष्ठा बनली. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करणे योग्य ठरले व अहिंसा हे लोकचळवळीसाठी अपरिहार्य धोरण ठरले. हे सर्व कार्यपद्धतीविषयी झाले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आदर्शांसाठी आम्ही लढत होतो त्याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना आली. त्या काळात प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात फारसे काम नसल्यामुळे जगातल्या इतर क्रांत्यांमधल्या आदर्शांचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला. अराजकवादी नेता बकुनीन याच्याबद्दल मी अभ्यास केला; साम्यवादाचा जनक मार्क्स याच्याबद्दल काही वाचले; स्वतःच्या देशात यशस्वीपणे क्रांती घडवणारे लेनिन, ट्राटस्कीव इतर यांच्याबद्दल बरेचसे वाचले. ते सर्व नास्तिक होते. सलग ग्रंथाच्या रुपात लेहिलेले नसले तरी बाकुनिनचे 'GOD AND STATE' (ईश्वर आणि शासनसत्ता) हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा उद्बोधक अभ्यास आहे. त्यानंतर निर्लंब स्वामींचे 'कॉमन सेन्स' या नावाचे पुस्तक माझ्या पाहण्यात आले. ते पुस्तक फक्त गूढवादी नास्तिकतेच्या प्रकारात मोडणारे आहे. या विषयात मला सर्वात जास्त आस्था वाटू लागली. १९२६ साली शेवटी विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्याचे नियंत्रण करणाऱ्या सर्वश्रेष्ठ ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या फोलपणाविषयी माझी खात्री झाली. माझी धार्मिक श्रद्धा मी दूर फेकली. मी याबद्दल उघड बोलू लागलो. माझ्या मित्रांशी या विषयावर चर्चा करायला सुरुवात केली. मी नंबर एक चा नास्तिक बनलो. पण त्या सर्वांचा नेमका अर्थ काय याची चर्चा नंतर करू. 

१९२६ मध्ये मला लाहोर येथे अटक झाली. त्या अटकेने मला आश्चर्याचा धक्का बसला. पोलिस माझ्या मागे आहेत या गोष्टीची मला कल्पना नव्हती. एका बागेतून जाताना अचानकपणे पोलिसांनी घेरल्याचे माझ्या ध्यानात आहे. त्याप्रसंगी मी अत्यंत शांत होतो याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. कसलेही संवेदना किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वे पोलिस कोठडीत नेण्यात आले. इथे मला सबंध महिन्याचा काळ कंठायचा होता. बरेच दिवस पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्या-चालण्यावरून मी तर्क केला कि काकोरी पक्षाशी आणि इतर क्रांतिकारक कार्याशी असलेल्या माझ्या संबंधांविषयी त्यांना काही माहीती मिळाली होती. त्यांनी मला सांगितले कि (काकोरी) खटल्याची सुनावणी चालू असताना मी लाहोरमध्ये होतो, त्यांच्या सुटकेसाठी सल्लामसलत करून मी एक योजना आखली होती, त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही बॉम्ब हस्तगत केले आणि चाचणी घेण्यासाठी १९२६ साली दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीत त्यातला एक बॉम्ब फेकला. त्यंनी मला हेसुद्धा सांगितले कि माझ्या भल्यासाठी जर मी क्रांतिकारी पक्षाच्या हालचालींवर प्रकाश टाकणारे काही निवेदन देऊ शकलो तर मला शिक्षा होणार नाही, उलट मला मुक्त केले जाईल आणि कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून उभेदेखील न करता सोडून देऊन मला इनाम दिले जाईल.

त्यांच्या या सूचनेला मी हसलो. तो सर्व भंपकपणा होता. आमच्यासारख्या कल्पना बाळगणारी माणसे आपल्याच निष्पाप माणसांवर बॉम्ब फेकत नसतात. एक दिवस सकाळीच त्या वेळचा गुप्तचर खात्यातला प्रमुख वरिष्ठ अधिकारी न्यूमन माझ्याकडे आला. बऱ्याच सहानुभूतीपूर्वक (त्याच्या दृष्टीने) बोलण्यानंतर एक अत्यंत दुखद अशी बातमी मला सांगीतली, 'मी जर त्यांनी मागितल्या प्रमाणे निवेदन दिले नाही तर काकोरी प्रकरणात बादशहाविरुद्ध युद्ध चालवण्याच्या कटाबद्दल आणि दुसऱ्या बॉम्बस्फोटातल्या  निघृण हत्येबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल.' त्याने मला आणखी असेही सांगितले कि पुन्हा शाबित करून मला फाशी देण्याइतपत पुरावा त्यांच्यापाशी आहे मी जरी निरपराध होतो तरी मला खात्री होती कि मनात आणले तर पोलीस त्यांना हवे ते करू शकत होते. 

पुढचा भाग लवकरच......


No comments:

Post a Comment