Saturday, February 7, 2015

मी नास्तिक का आहे? -भगतसिंग part 1 of 6

एक नवीनच प्रश्न उभा  राहिला आहे : सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईखोरपणामुळे नाकारतो आहे का? ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. पण मी मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्ष्यात आले की ह्या माझ्या मित्रांना- मी तरी त्यांना मित्र मानतो - माझा जो काही थोडासा सहवास मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे कि देवावरचा अविश्यास हा माझा जरा अतिरेकीपनाच आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उथळपणा व दाखवेगिरी एवढीच कारणे आहेत. एकूण ही समस्या तशी गंभीर आहे. मनुष्य स्वभावातल्या या दोषास्पद प्रव्रतींपासून मी पूर्णपणे मुक्त आहे अशी बढाई मी मारत नाही. मी माणूस आहे. बस्स, याहून जास्त काही नाही. तसला काही दावाही मी करत नाही आणि कोणीही असा दावा करू शकत नाही. माझ्यातही ही उणीव आहे.

पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्यांत मी एकाधिकारशहा म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बी.के.दत्त हेसुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. काही प्रसंगी तर जुलमी सत्ताधीश म्हणूनही माझी संभावना केली जायची. काही मित्र गंभीरपणे तक्रार करतात कि मी माझ्या नकळत माझी मते दुसर्यांवर लादतो व माझे निर्णय मान्य करून घेतो. त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही. हे सर्व म्हणजे कदाचित अहंमान्यता असेल. इतर लोकप्रिय मतप्रवाहांच्या तुलनेने आपला पंथ जितका व जसा वेगळा आहे  तितक्या प्रमाणात माझ्यात गर्विष्ठपणा आहे. पण तो वैयक्तिक स्वरूपाचा नाही. कदाचित तो आपल्या श्रध्येविषयीचा योग्य अभिमान असेल पण त्यला गर्विष्ठपणा म्हणता येणार नाही. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर 'अहंकार' हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाच अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रध्ये पर्यंत आलो आहे या प्रश्नाची मी येथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते कि अहंमन्यता आणि पोकळ ऐट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.  

पहिली गोष्ट म्हणजे गैरवाजवी अभिमान किंवा फुकटचा गर्विष्ठपणा ह्या गोष्टी देवावर विश्वास ठेवण्याच्या माणसाच्या वाटेवर  अडथला होऊच कश्या शकतात हे मला खरोखरच उमजत नाही. लायकी नसूनही, किंवा त्यासाठी खरे म्हणजे मुलभूतरित्या आवश्यक असणारे गुण अंगी नसूनही, जर मला काही प्रमाणात  प्रसिद्धी मिळालेली असेल तर एखाद्या खरया थोर माणसाची थोरवी मी नाकारू शकतो, एवढे समजण्या सारखे आहे. परंतु देवावर विस्वास ठेवणारा मनुष्य त्याच्या अंगच्या दाखविगिरीमुळे असा विश्वास ठेवणे कसे थांबवू शकतो? हे दोनच प्रकारे होऊ शकते. त्या माणसाने स्वतःलाच ईश्वराचा प्रतिस्पर्धी म्हणून समजायला सुरुवात केली किंवा तो स्वतःलाच ईश्वर समजू लागला तर. पण दोन्ही प्रकरणी तो खराखुरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या प्रकारात तो प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारत देखील नसतो. दुसर्या प्रकारातही निसर्गातल्या घडामोडींचे नियंत्रण करणारे, पडद्यामागचे एक चैतन्यास्वरूपी अस्तिव तो मान्य करतोच. तो स्वतःला ही श्रेष्ठ शक्ती समजतो कि अशी शक्ती स्वतःपेक्ष्या वेगळी कुणी दुसरी आहे असे मानतो हे आपल्या दृष्टीने महत्वाचे नाही. मुळ प्रवर्ति त्यात आहेच. त्यचा अंधविश्वास आहेच. तो कोणत्याही प्रकारे नास्तिक नाही. आता माझेच घ्या. मी यापैकी पहिल्या प्रकारातही मोडत नाही किंवा दुसर्या प्रकारातही नाही. सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्व मी मुळात नकर्तिओ. मी ते का नाकारतो हे नंतर बघू. येथे मला ह्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे आहे की नास्तिकतेची शिकवण अंगीकारण्यास पोकळ गर्विष्ठापणाने मला उद्यूत केलेले नाही. मी स्वतःच ती सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा तिचा प्रतिस्पर्धी व अवतार नाही. एक गोष्ट आता निश्चित आहे की अशा प्रकारच्या विचारसरणीकडे मी वळण्यास स्वतःचा बडेजाव कारणीभूत नाही.  

हा आरोप खोटा आहे हे शाबित करण्यासाठी आपण वस्तुस्तिथी पडताळून पाहू. या माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मला मिळाल्याल्या अवाजवी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणे बरोबर आहे का ते आपण पाहूया. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबविले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो, तरी मी कधी अभ्यासु किंवा चमकणारा मुलगा नव्हतो. ज्याला ऐट म्हणतात अशा प्रकारची भावना निर्माण संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्याक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता, अशा शामळू व बुजर्या वृतीचा मी मुलगा होतो आणि त्या काळात मी संपूर्णपणे मी नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काहीही असो पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या डी. ए. व्ही. शाळेत गेलो आणि एक वर्ष मी तिथल्या वस्तीगृहात मी राहिलो. तिथे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेव्यातिरिक्त मी तासनतास गायत्री मंत्र पठण करीत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांसोबत राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्पुर्ती मला त्यांच्या शिकवनीतुनच मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. ते कट्टर आस्तिक आहेत. ओज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अश्या प्रकारे मी लहानाचा मोठा झालो. असहकाराच्या दिवसात मी न्याशनल कॉलेजात जाऊ लागलो. उदारमतवादाला अनुसरून विचार करणे, देव किंवा धार्मिक प्रश्नाबाबत चर्चा करणे व त्यांच्यावर टीका करणे हे मी तेथेच सुरु केले. पण तरीही मी श्रद्धावान आस्तिक होतो. त्या वेळेपावेतो मी केस न कापता ते लांब राखण्यास सुरुवात केली होती, परंतु पौराणिक गोष्टी  किंवा शीख व इतर कोणत्याही धर्माच्या शिकवणुकीवर माझा कधी विश्वास बसला नव्हता. पण देवाच्या अस्तित्वावर पक्का विश्वास होता.  




No comments:

Post a Comment